राजापूरपासून मुंबईकडे जाताना सुमारे १० किमी अंतरावर असलेल्या ओणी गावापासून एक रस्ता सौंदल गावाकडे जातो. तिथून डाव्या हाताला सुमारे ५ किमी अंतरावर घागवाडी नावाचं एक छानसं, टुमदार कोकणी गांव आहे. गावात शिरताच तिथलं शांत निवांत वातावरण जाणवू लागतं.

तालुका - राजापूर

बस स्थानक - राजापूर

रेल्वे स्थानक - राजापूर रस्ता

योग्य काळ - जुलै ते ऑक्टोबर  

अधूनमधून गुरांच्या हंबरण्याचे आवाज आणि  कोंबड्यांनी एकमेकांना घातलेली साद ऐकू येत असते. गच्च रानातून गेलेली लाल मातीची नागमोडी पायवाट वळणावळणाने पुढे सरकत असते. साथीला पक्ष्यांचा गुंजारव असतो तर वाटेवर फुललेल्या असंख्य फुलांवर मधमाश्यांची आणि फुलपाखरांची लगबग चालू असते. या सगळ्या प्रसन्न वातावरणात वाट कधी सरते ते कळतंच नाही आणि मनावर पडलेल्या रानभुलीतून जाग येते ती धबधब्याची गाज ऐकून. जवळ जाताजाता आवाज आणखीनच वाढत जातो आणि वाटेवर अचानक समोर येतो तो ओझरकडा धबधबा.

तसा हा धबधबा फार उंच नाही. याची जेमतेम ५० फूट उंची असल्याने तो खूप भीतिदायकही वाटत नाही. या धबधब्याच्या वरील भागांत गच्च जंगल असल्याने पाण्यात माती मिसळण्याचे प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे खालच्या डोहांत शुभ्र, स्वच्छ जलधारा अविरत पडत असतात. या धबधब्याची एक गंमतीदार गोष्ट अशी आहे की याचा जन्म होतो लांजे तालुक्यात आणि धबधबा कोसळतो मात्र राजापुरांत. निसर्गाबद्दल प्रेम असणाऱ्या निसर्गप्रेमींसाठी ओझरकड्यासारखी दुसरी जागा नाही. इथे निसर्गपर्यटनाचा भरपूर आनंद लुटता येतो. भर पावसात ओणीवरून सौंदलकडे जाताना डावीकडे दिसणाऱ्या हिरव्यागार निसर्गचित्रात कुणीतरी कुंचल्याने पांढऱ्या रंगाचा फटकारा मारल्यासाराखा वाटणारा ओझरकडा ८ किमी अंतरावरूनही स्पष्ट दिसत राहातो.

मात्र इथे येणाऱ्या पर्यटकांनी या चित्रात आपले कुठलेही रंग भरण्याचा प्रयत्न करू नये. म्हणजेच इथल्या सुंदर निसर्गात आपला कुठलाही हस्तक्षेप होणार नाही याची काळजी घ्यावी. आपल्याबरोबरच्या प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, पिशव्या व अन्य कचरा इथे कुठेही न टाकता ओझरकडा व आसपासच्या परिसराचे सौंदर्य अबाधित राहील याची काळजी घेणं गरजेचं आहे.

अनुभवण्यासारखे खूप काही

सुपारी (पोफळी)

चला तर मग!

पंखांवरचे भरारते जग

चला तर मग!

लोकमान्य टिळक जन्मस्थान, रत्नागिरी

चला तर मग!
Positive SSL