गुहागर हे अतिप्राचीन म्हणजे भगवान परशुरामांच्या काळापासून अस्तित्वात आहे असे मानतात. गुहागरची खरी प्रसिद्धी आहे ती श्री व्याडेश्वर या सुंदर देवस्थानामुळे. गुहागर हे अतिशय सुंदर गाव आहे. पूर्वेकडच्या डोंगराला पाठ टेकवून समोरच्या अथांग सागरतीरावर नारळी पोफळीच्या दाट झाडीत गुहागर लपलं आहे. इथे वावरताना समुद्राचा सहवास सतत लाभत असतो. इथला हवाहवासा हिरवागार निसर्ग, दाट झाडीत लपलेली प्राचीन मंदिरे, चवदार कोकणी भोजन आणि अगत्यशील गुहागरवासींमुळे गुहागरची सहल खूप काळ आठवणीत राहाते. गुहागरला निवास-न्याहारी या योजनेअंतर्गत स्थानिक घरांमध्ये राहाण्याची उत्तम सोय होऊ शकते. गुहागर ते असगोली हा ६ कि.मी. लांबीचा किनारा अतिशय स्वच्छ, शांत व सुरक्षित असून इथल्या मऊ वाळूतून चालताना तासंतास कसे निघून जातात ते समजतच नाही.

Positive SSL