पुणे व मुंबईकडून रत्नागिरीसाठी थेट महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेस आणि खाजगी बससेवाही उपलब्ध आहेत. बहुतेक गाड्या या रात्री प्रवास करणाऱ्या असून सकाळी सकाळी लवकर रत्नागिरीस पोहोचतात.

पुण्याहून मुळशीमार्गे ताम्हणी घाटातून, भोरमार्गे वरंधा घाटातून, वाई-महाबळेश्वरमार्गे पोलादपूर घाटातून तसेच सातारा - पाटण मार्गे कुंभार्ली घाटातून  उतरून मुंबई - गोवा महामार्गावर पोहोचता येते. या मार्गांवरही अनेक पर्यटनस्थळे असून ती बघत बघत घाटातून खाली उतरता येते. 
अंतर - ३०० कि. मी.

मुंबईवरून मुंबई-गोवा महामार्गाने पनवेल-वडखळ-माणगांव-लोणेरे-भरणे नाका(खेड) येथून परशुराम घाटामार्गे चिपळूण-संगमेश्वर-निवळी फाटा(गणपतीपुळे)-हातखंबा-रत्नागिरी असेही जाता येते.  अंतर - ३४७ कि. मी.

गोव्याकडून सिंधुदुर्ग जिल्हा ओलांडून रत्नागिरीला पोहोचता येते.  अंतर - २३५ कि. मी.

कोल्हापूर-रत्नागिरी हे अंतर केवळ १३२ कि.मी. असून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेसची सेवा उपलब्ध आहे.

मुंबईजवळील पनवेलपासून कोकण रेल्वेचा मार्ग सुरू होतो व रायगड जिल्ह्यातील रोह्यापासून तो कोकणाकडे मार्गस्थ होतो. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, अंजनी, चिपळूण, कामथे, सावर्डा, अरवली रोड, संगमेश्वर, उक्षी, भोके, रत्नागिरी, निवसर, आडवली, राजापूर रोड इ. रेल्वे स्थानकं या मार्गावर येतात. हिरव्या वाटा पार करत, डोंगरांना वळसे घालत, लांब बोगदे पार करत, खाड्या नद्यांवरचे पूल ओलांडत, टुमदार कोकणी गावातून जाणाऱ्या कोकण रेल्वेचा प्रवास अनुभवावा असाच आहे.

रत्नागिरी जिल्ह्याला सर्वात जवळ असलेले विमानतळ म्हणजे मुंबई आणि गोवा. सध्या शेजारीच असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात चीप्पी येथे अजून एक विमानतळ आकारास येतो आहे. तो पूर्ण झाल्यावर रत्नागिरीस हवाईमार्गाने जाणे अजून सोयीचे होईल.  

Positive SSL