रत्नागिरी जिल्ह्यात अनेक उत्तमोत्तम ठिकाणी असलेली व प्रत्येकाला आवडीनुसार परवडणारी अशी निवासव्यवस्था सर्वत्र उपलब्ध आहे. कर्दे, गुहागर, रत्नागिरी, मुरुड, गणपतीपुळे, वेळणेश्वर अशा अनेक समुद्रकिनाऱ्यांवर पंचतारांकित सुविधा पुरविणारी भरपूर हॉटेल्स व अगदी उत्तम घरगुती निवासव्यवस्था विनासायास मिळू शकते.

लांबवर पसरलेल्या अथांग सागराच्या निळाईत भिजायचे असेल तर अगदी किनाऱ्यावर राहाण्यासाठी अनेक उत्तम हॉटेल्स उपलब्ध आहेत. अगदी उन्हाळयाच्या हंगामातसुध्दा आरामदायी लाकडी हट्‌स किंवा तंबूमध्ये राहून माडांच्या राईतला थंडावा मस्तपैकी अनुभवावा. उन्हाची तलखी अगदीच असह्य झाली तर सगळीकडे वातानुकूलित निवासव्यवस्था असून उन्हापासून गारवा मिळविण्यासाठी डुंबायला बीच रिसॉर्ट्सवर सुंदर तलाव आहेतच. इथल्या पूलसाईड रेस्टॉरंट्‌समध्ये बसून मनसोक्त खाण्या-पिण्याचा आनंद लुटावा किंवा माडांच्या सावलीत हॅमॉकवर आरामात लोळत पडावं. हवं असल्यास साथीला चवदार कोकणी जेवण सर्वत्र उपलब्ध आहेच.

कोकणी वाड्यांत निवांत वेळ घालवायचा असेल तर गुहागर, हेदवी, मुरुड, रत्नागिरी, दापोली, राजापूर अशा अनेक ठिकाणी घरगुती न्याहारी व निवासाची अगदी स्वस्त आणि मस्त सोय होऊ शकते. किनाऱ्याला खेटून उभ्या असलेल्या कोकणी वाडीतील अगत्यशील पाहुणचार, नारळी पोफळीच्या बागा, टुमदार कोकणी घरं मनाला अगदी  सुखावणारी असतात आणि त्याला साथ असते ती प्रेमाने खाऊ घातलेल्या रुचकर कोकणी जेवणाची!

Positive SSL