जयगड हा ऐतिहासिक सागरीदुर्ग शतकानुशतके किनाऱ्यावर उभा आहे. या किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व सांगणारी १६ व्या शतकातील कागदपत्रे उपलब्ध आहेत. किल्ल्याच्या एकूण बांधणीवरून जयगड किल्ला हा विजापूरकरांनी बांधला असावा असा अंदाज आहे. त्यानंतर १५७८-८० च्या सुमारास संगमेश्वर येथील नाईक यांनी तो जिंकून घेतला परंतु अनेकदा प्रयत्न करूनही विजापूरकरांना हा किल्ला परत जिंकता आला नाही. इ.स. १६९५ पासून जयगड कान्होजी आंग्रे यांच्याच ताब्यात होता. अखेर इ.स. १८१८ मध्ये कोणत्याही लढाईशिवाय हा किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला.

तालुका - रत्नागिरी

बस स्थानक - गणपतीपुळे

रेल्वे स्थानक - रत्नागिरी

योग्य काळ - वर्षभर 

गडाच्या मुख्य दरवाजाशेजारी एक छोटा दरवाजा असून तिथून जयगड बंदराकडे थेट रस्ता जातो. मुख्य दरवाजाची कमान उत्तम अवस्थेत असून आत देवड्या आहेत. दरवाजाच्या कमानीची बांधणी मुस्लिम पद्धतीची आहे. तर कमानीवर दोन्ही बाजूंना दोन कमळशिल्पे व मध्यभागी एक गुलमोहोरासारखे पुष्प कोरले आहे.

किल्ल्यात प्रवेश केल्यावर डावीकडील तटबंदीत खोल्या आढळून येतात. पुढे तटावर जाण्यासाठी पायऱ्या असून तिथून पुढे गेल्यावर उजवीकडे एक प्रशस्त मैदान व अनेक वास्तू दिसून येतात. मुख्य दरवाजावर म्हणजे मेघडंबरीच्या जागेवर ब्रिटिश काळात दोन मजले बांधून विश्रामगृह बांधलेले आढळते. पुढे उत्तरेकडे गेल्यावर मोठ्या तीन मजली वास्तू व जवळच कौलारू गणेश मंदिर असून त्याच्याबाहेर पूर्वी दोन दीपमाळा होत्या ज्यातील एकच सध्या अस्तित्वात आहे. मंदिरामागे एका मोठ्या वाड्याची वास्तू आजही तग धरून असून  मंदिराजवळच जयबाचे स्मारक आहे. पुढे तटबंदीजवळ गेल्यावर आत खोल्या बांधलेल्या दिसतात. तटबंदीवर एक नवीन मनोरा आहे. गडाच्या उत्तरेला तटबंदीवर दोन मजली बुरुज आहे व प्रवेश करायला दोन दिंडी दरवाजे आहेत.

गडाच्या बाहेरून गडाच्या संरक्षणार्थ खोदलेला खंदक आहे. जयगडाचे पडकोट व बालेकिल्ला असे दोन मुख्य भाग आहेत. मुख्य किल्ल्याला १४ बुरुज असून, पडकोटाला १० बुरुज आहेत, जे खाडीलगत बांधले आहेत. बालेकिल्ल्यातून पडकोटाकडे जाताना मोठा उतार आहे आणि सध्या तिथे जयगड गाव वसलेले आहे.

गणपतीपुळ्यापासून १६ कि.मी. अंतरावरील जयगड बंदर हे अनेक शतकांपासून व्यापाराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे राहिले आहे. आजही ते एक उपयोगी बंदर म्हणून वापरात आहे. अशा या ऐतिहासिक ठिकाणी जयगड हा तितकाच ऐतिहासिक सागरीदुर्ग शतकानुशतके अस्तित्वात आहे.

शास्त्री नदीच्या खाडीतील जयगड किल्ला १२ एकर परिसरात विस्तारला असून आजही तो पूर्वीइतकाच भक्कमपणे ठाण मांडून उभा आहे. रत्नागिरीकडून खंडाळे-जयगड असा एस.टी. मार्ग असून रत्नागिरीपासून जयगड ४५ कि.मी अंतरावर आहे. हा सागरीदुर्ग समुद्रापासून ५५ मीटर उंचीवर असून चढायला अगदी सोपा आहे. जयगड पोलीस चौकीपासून गडावर जायला फक्त ५ मिनिटे लागतात. जयगडपासून जवळ भ्रमंती करण्यासाठी गणपतीपुळे, कोळिसरे लक्ष्मिकेशव, मालगुंड आदी ठिकाणे आहेत.

अनुभवण्यासारखे खूप काही

थिबा पॅलेस, रत्नागिरी

चला तर मग!

याकूतबाबा दर्गा, केळशी

चला तर मग!

मंडणगड किल्ला, मंडणगड

चला तर मग!
Positive SSL