कोकणाला जगण्याची नवी उर्जा देणारा गणेशोत्सव जवळ आला की सगळीकडे उत्साहाचे वारे वाहू लागतात. ३ ते ४ महिने आधीपासूनच मूर्तीकार गणेश मूर्तींची वेगवेगळी रूपे साकारण्यात मग्न होतात. भारताच्या कानाकोपऱ्यात नोकरी–व्यवसायाच्या निमित्ताने स्थायिक झालेला कोकणी माणूस गणेशोत्सवासाठी मात्र हमखास आपल्या मूळ गावाची वाट धरतो.

रत्नागिरी जिल्ह्यातील वाड्या-वस्त्यांमधून घरोघरी लाडक्या गणेशाचे आगमन होते आणि सकाळ संध्याकाळ समूहाने, साग्रसंगीत टाळ मृदंगाच्या साथीने म्हंटल्या जाणाऱ्या आरत्यांचे सूर वाड्यांमधून ऐकू येऊ लागतात. लाडक्या बाप्पांसाठी आपापल्या परीने घराघरांतून सुंदर आरास केलेली असते. तिसऱ्या दिवशी होणारे गौरींचे आगमन हा महिलावर्गासाठी एक आनंदाचा क्षण असतो. अतिशय हौसेने गौरी-गणपतीसाठी नैवेद्य आणि गोडाधोडाचे जेवण तयार केले जाते. श्री गणेशाचे आवडते उकडीचे मोदक, पुरणपोळी अशी पारंपरिक पक्वान्ने बनवली जातात.

दहाव्या दिवशी होणारे `गणेश विसर्जन` म्हणजे उत्साहाची व आनंदाची पर्वणी असते. वाडीतील घरांमधले गणपती गावातील एका विशिष्ट जागी एकत्र आणले जातात. ढोल, ताशांचा गजर दुपारपासूनच सुरू झालेला असतो. सर्व गणेशमूर्तींची सामूहिक आरती झाल्यावर आपापल्या बाप्पांची मूर्ती मोठ्या भक्तिभावाने डोक्यावर घेऊन गणेशभक्त विसर्जनासाठी सिद्ध होतात. वाडीतील आबालवृद्ध, महिलांची सायंकाळच्या सोनेरी उन्हात हिरव्याकंच भातशेतातून विविध वाद्यांच्या गजरात अनेकरंगी गुलालाची उधळण करत निघालेली विसर्जन मिरवणूक डोळ्यांचं पारणं फेडते.

दहा दिवस हव्याहव्याशा वाटणाऱ्या या पाहुण्या गणेशाचा `गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या` असे म्हणत थोड्या जड अंतःकरणानेच निरोप घेतला जातो. 

अनुभवण्यासारखे खूप काही

गणपतीपुळे समुद्रकिनारा

चला तर मग!

आरे-वारे समुद्रकिनारा

चला तर मग!

श्री क्षेत्र मार्लेश्वर, संगमेश्वर

चला तर मग!
Positive SSL