रत्नागिरीचा संपूर्ण परिसर येथे आढळणाऱ्या अनेक निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित आश्चर्यांसाठी प्रसिध्द आहे. हेदवी येथील भौगौलिक आविष्कार असलेली `बामणघळ`, केळशीतील हजारो वर्षांपूर्वी त्सुनामीमुळे तयार झालेली वाळूची टेकडी, शेकडो वर्षांपासून अविरत अवतरणारी `राजापूरची गंगा` असे अनेक चकित करणारे नैसर्गिक आविष्कार तर न चुकवता येण्यासारखे आहेत. राजवाडी, तुरळ, उन्हवरे, उन्हाळे अशा १४ ठिकाणी असणारे गरम पाण्याचे झरे व कुंडे हे तर रत्नागिरीचे एक खास वैशिष्ट्य. निसर्गनवलांबरोबरच रत्नागिरीत मानवनिर्मित आविष्कारही बघण्यासारखे आहेत. पन्हाळेकाजी व खेड येथील दगडात खोदून काढलेली प्राचीन लेणी खास बघण्यासारखी आहेत तर अनेक ठिकाणी नव्यानेच उजेडात आलेली अतिप्राचीन गूढ कातळशिल्पं हा तर आवर्जून भेट देण्यासारखा मानवनिर्मित कलाविष्कार आहे.

विविध प्राणी, पक्षी, अगम्य भौमितिक रचना, अनाकलनीय चित्रलिपी असणारी ही खोदचित्रे हे एक गूढ असले तरी तो एक मानवनिर्मित सुंदर आविष्कार आहे.

कोटजाई व धाकटी नद्यांच्या संगमावर हीनयान बौध्द, गाणपत्य व नाथ संप्रदायातील २९ लेण्यांचा समूह इथे कित्येक शतके आपले गतवैभव सांभाळत उभा आहे.

खेड तालुक्यातील बौद्धकालीन खेडची लेणी खेड बसस्थानकापासून जवळच आहेत. खूप पूर्वी ही लेणी व्यापारी मार्गावरील विश्रांती स्थळ म्हणून वापरली जात असावीत असा अंदाज आहे.

ऐन भरतीचा वेळी गेल्यास उंच तुषार उडवत उसळणारा जलस्तंभ आपलं लक्ष वेधून घेतो. हेदवीची बामणघळ हा निसर्गाचा एक रौद्र आविष्कार आहे.

खूप प्राचीन काळापासून या स्थानावर गंगा अचानक प्रकट होत असून हे एक भूवैज्ञानिक आश्चर्य मानलं जातं.

गरम पाण्याच्या झऱ्यावर खास स्नानासाठी बांधलेली काही कुंड असून येथे गरम पाण्यात स्नानाचा आनंद घेता येतो.

जवळच पाणथळीच्या दोन अशा जागा आहेत जिथून गरम पाणी सतत बाहेर येताना दिसते. इथे सृष्टीच्या या भौगोलिक चमत्काराचा मनसोक्त आनंद लुटता येतो.

अतिशय अप्रतीम निसर्गसौंदर्य लाभलेल्या उन्हवरे गावात चुकवू नये असं एक निसर्गनवल आहे. इथल्या भूभागांतून उगम पावणाऱ्या झऱ्यामधून अक्षरशः उकळते पाणी बाहेर पडत असते.

-->
Positive SSL