रत्नागिरीचा स्थानिक कोकणी माणूस खूप कष्टाळू आहे. निसर्गाने बहाल केलेल्या मोजक्याच साधनसामग्रीत तो त्याचा चरितार्थ आनंदाने चालवत असतो. रत्नागिरीतील कृषी व्यवसायाचा विचार करता या जिल्ह्यातील भात किंवा तांदूळ हे प्रमुख पीक असून आंबा, काजू, नारळ, सुपारी, फणस, कोकम, मसाल्याचे पदार्थ व इतरही वैशिष्ट्यपूर्ण कृषी उत्पादने रत्नागिरीत घेतली जातात. हर्णे, रत्नागिरी, मिऱ्या, नाटे अशा अनेक मोठ्या बंदरांवर मासेमारीचा व्यवसाय प्रचंड प्रमाणात चालतो. बंदरांवर होणारा माशांचा लिलाव ही एक आवर्जून बघण्यासारखी गोष्ट आहे. कोकणात लागणाऱ्या जांभ्या दगडाची गरज भागविणारा व स्थानिकांना नियमित रोजगार मिळवून देणारा आणखी एक उद्योग म्हणजे चिरा खाण. कोकणात घरबांधणीसाठी, पाखाडी म्हणजेच पायऱ्यांसाठी, मंदिर बांधणीसाठी, कच्च्या रस्त्यांसाठी लागणाऱ्या जांभ्या दगडाची गरज चिरा खाण भागवते.

उन्हाळा सुरु होताच कोकणवासियांसकट सर्वांनाच सुमधुर चवीच्या रत्नागिरी हापूसचे वेध लागतात. रत्नागिरीतील दमट व उष्ण हवामान आणि लाल माती आंब्याच्या भरपूर उत्पादनासाठी अनुकूल आहे.

भाताच्या पिकासाठी पाऊस मोठ्या प्रमाणावर लागतो त्यामुळे सह्याद्रीलगतच्या खेड, राजापूर, संगमेश्वर, चिपळूण इ. तालुक्यात भाताचे पिक विपुल प्रमाणावर घेतले जाते.

येथे रोज सायंकाळी भरणारा प्रचंड मोठा मासळीबाजार बघण्यासारखा असतो. शेकडो बोटी रोज मासेमारी करून येतात. येथे माशांचे विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळतात.

रत्नागिरी जिल्ह्यांत अनेक ठिकाणी असणाऱ्या काजू प्रक्रिया केंद्रांमधून काजूचे भरपूर उत्पादन होते. उन्हाळ्याच्या दिवसांत काजूच्या हंगामात रत्नागिरीतील तयार काजू आणि काजूगर खाल्लाच पाहिजे.

समुद्र किनाऱ्यावर व कोकणी वाड्यांमधे सर्वत्र माडांच्या दाट राया आढळतात व तिथून नारळाचे भरपूर उत्पादन होते. त्याच्या गोड खोबऱ्याशिवाय कोकणातील गृहीणीचा एकही पदार्थ पूर्ण होऊ शकत नाही.

सुपारीच्या हिरव्यागार गच्च बागांमध्ये, वाळत घातलेल्या सुपारीने झाकलेली ती कोकणी कौलारू घरे बघणे हा नजारा डोळ्याचे पारणे फेडणारा असतो.

परसातील झाडांवरून ताज्या ताज्या निवडून आणलेल्या मसाल्यांचे वाटण घातलेले पदार्थ आपल्यालाही ताजेतवाने बनवून जातात. सुवासिक व उत्तम चवींच्या पदार्थांमुळे कोकणी जेवण चवदार बनले नाही तरच नवल!

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उंचसखल भागात चालत जाण्यासाठी बनवलेल्या चिऱ्यांच्या पाखाडी, नारळी पोफळीच्या बागांना असलेल्या ताली, मंदिरे, घरांना असलेली भक्कम दगडी कंपौंड या सर्व गोष्टींसाठी जांभ्याच्या दगडाचाच वापर केलेला दिसतो.

रत्नागिरी मध्ये फिरतांना आपल्याला बुरुड, लोहार, पाथरवट अशा वेगवेगळ्या पारंपारिक व्यवसायात गुंतलेले कलाकार दिसतात. एकमेकांवर अवलंबून असलेल्या समाजव्यवस्थेचा ते एक अविभाज्य भाग आहेत.

Positive SSL