रत्नागिरी जिल्ह्याला १६७ किमी.लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून इथले शुभ्र, रुपेरी वाळूचे सुंदर किनारे पर्यटकांना नेहमीच आपल्याकडे आकर्षित करतात. इथे आढळून येणारी सागरी जीवसृष्टी विविधतेने संपन्न आहे. फेसाळत्या रुपेरी लाटांच्या सान्निध्यात सोनेरी सूर्यास्त पाहाण्याचा अनुभव व सुरक्षित सागरी किनाऱ्यावंर समुद्रस्नानाचा आनंद हा पुनःपुन्हा घ्यावा असाच असतो. सर्व सुविधांनी युक्त अशी निवासव्यवस्था इथल्या अनेक हॉटेल्समध्ये आहे. किनाऱ्यांवर उपलब्ध असणारे विविध वॉटर स्पोर्ट्स व साहसी जलक्रिडा इथे मनसोक्त अनुभवाव्यात.

रत्नागिरी जिल्ह्याला १६७ किमी.लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून इथले शुभ्र, रुपेरी वाळूचे सुंदर किनारे पर्यटकांना नेहमीच आपल्याकडे आकर्षित करतात.

दापोलीच्या दक्षिणेस हर्णे गावाच्या अलीकडे वळसा घालून डोंगरमाथा पार केल्यावर एका स्तिमित करणाऱ्या विस्तीर्ण निसर्गचित्रांत आपला प्रवेश होतो.

डोंगराच्या समुद्रात घुसलेल्या टोकामुळे निर्माण झालेले इथले दोन जुळे समुद्रकिनारे म्हणजे आरे आणि वारे. कोणाला किती सौंदर्य बहाल करायचं हा प्रश्न निसर्गालाही इथे पडला असावा.

मऊ पुळणीवर पावलांना गुदगुल्या करणारी मखमली वाळू अनुभवताना तासंनतास केव्हा निघून जातात ते कळतंच नाही. वाळूतून हिंडणार्‍या छोट्या छोट्या खेकड्यांचं निरीक्षण करतानाही मजा वाटते.

थंडीच्या मोसमात किनार्‍यावर येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांना कॅमेऱ्यांत टिपण्याची छायाचित्रकारांसाठी ही एक सुवर्णसंधीच असते. स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने पर्यटक `डॉल्फिन्स राईड` चा अनुभव घेऊ शकतात.

बनाना राईड, वॉटर स्कूटर, पॉवर बोट हे सगळं अनुभवायचं आणि तेही फेसाळणाऱ्या लाटांवर आरूढ होऊन…हा एक थरारक अनुभव असतो.

थंडीच्या दिवसांत समुद्र शांत असल्यावर छोट्या बोटींमधून समुद्रात जाऊन डॉल्फिंन्सची जलक्रिडा अनूभवता येते.

नारळी पोफळींच्या बागांनी वेढलेला व लाटांच्या घनगंभीर गाजेने भारलेला वेळणेश्वरचा स्वच्छ समुद्रकिनारा.

उंच उंच गेलेल्या सुरुच्या झाडांमधून दिसणारा निळाशार दर्या आणि चमकत्या लाटा आपल्याला थांबायला भाग पाडतात.

केळशीमधील उटंबर डोंगराजवळील समुद्रात घुसलेल्या काळ्या कातळांवर विविध प्रकारची सागरी संपत्ती मिळू शकते. खडकांवर साठलेल्या पाण्यांत शंख, शिंपले, कवड्या, समुद्री काकड्या, अर्चीन्स असे विविध समुद्रीजीव आढळतात.

संपूर्ण गावाने एक होत भाऊ काटदरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कासव संरक्षणाची शपथ घेतली आणि दुर्लक्षित असलेले वेळास गाव जगाच्या नकाशावर आले.

रत्नागिरीपासून उत्तरेकडे गणपतीपुळे ४८ किमी अंतरावर आहे. गणपतीपुळेच्या उत्तरेस खाडी असून खाडीपलीकडे मालगुंड गाव आहे.

गावात देवीचे देऊळ असून अजिबात गर्दी-गोंगाट नसलेल्या ह्या शांत निवांत सागरतीरी बाजुच्या डोंगरमाथ्यावरून रम्य सूर्यास्त न्याहाळत मारलेला फेरफटका सहलीची सुखद आठवण ठरतो.

भौगोलिकरित्या रत्नागिरी जिल्हा खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. रत्नागिरिची उत्तर सीमा म्हणजे बाणकोटची खाडी आणि दक्षिण सीमा म्हणजे वाघोटनची प्रशस्त खाडी.

Positive SSL