कोकणात आषाढ महिना सरत आला की पाऊस थोडा विश्रांती घ्यायला लागतो. सर्वत्र श्रावणातील प्रसन्न वातावरणात असते. मनासारखा पाऊस झाल्याने शेतकरीही समाधानी असतो आणि नुकतीच भातलावणी पार पाडून विसावा घेत असतो. या उत्साही वातावरणात मनही प्रसन्न होते आणि आबालवृद्धांपासून सर्वांना वेध लागतात ते गणेशोत्सवाचे.

मनावर वेगळीच धुंदी पसरू लागते आणि मनाला नवी ऊर्जा देणाऱ्या पारंपरिक `जाखडीचे` स्वर सगळीकडे घुमू लागतात. ढोलकीवर जोरदार थाप पडल्यावर, उजव्या पायात चाळ बांधून, भरजरी कपड्यांनी सजलेले नर्तक गाणाऱ्या बुवाने नमनाला `गणा धाव रे, मला पाव रे` अशी सुरुवात केल्यावर उत्साहाने नृत्याला सुरुवात करतात. त्या ठेक्यावर श्रोतेगणही तल्लीन होऊन त्यांची पाऊले आपोआपच ताल धरू लागतात. कोकणवासीयांना जगण्याची उमेद देणाऱ्या जाखडीची श्रावण महिन्यात ढोलकीवर पडलेली थाप ही शिमाग्यानंतरच विसावते.

सर्वत्र `बाल्या नृत्य` किंवा `चेऊली` म्हणून परिचित असणारा हा नृत्यप्रकार रत्नागिरीत मात्र `जाखडी` लोकनृत्य म्हणून जास्त परिचित आहे. या शब्दप्रयोगामागेही सामाजिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे. जे गोलाकार पद्धतीने `खडी` म्हणजे उभं राहून केलं जातं ते नृत्य म्हणजे जाखडी.

या नृत्याचे सादरीकरणही वैशिष्ट्यपूर्ण असते. ढोलकीवादक, झांजवादक, मृदंगवादक, गायक हे सर्वजण मध्यभागी बसतात व त्यांच्याभोवती शक्ती व तुरेवाले या दोन्ही प्रकारचे नर्तक शिवाचे स्तवन व कृष्णाच्या लीलांचे नृत्यातून सादरीकरण करतात. अतिशय रंजक तालांनी व घुंगरांच्या मधुर नादामुळे वेधक बनणारा जाखडी हा नृत्यप्रकार नर्तकांबरोबरच श्रोत्यांनाही नाचायला लावतो.

विशेष म्हणजे आता महिलाही पुरुषांप्रमाणे ह्या नृत्यात सहभागी होतात व त्यांचेही नृत्य आता प्रसिध्द होऊ लागले आहे. नव्या पिढीने कालानुरूप या पारंपरिक नृत्यांत आपलेही रंग भरले असून पूर्वीइतक्याच जोमाने आजही हा नृत्यप्रकार आबालवृद्धांपासून सर्वांचे मनोरंजन करतो आहे.

अनुभवण्यासारखे खूप काही

जयगड, रत्नागिरी

चला तर मग!

मल्लिकार्जुन मंदीर

चला तर मग!

गणेश मंदिर, गणेशगुळे

चला तर मग!
Positive SSL